

सोलापूर : सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरात महावितरणने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान तब्बल १०२ वीज चोरांवर कडक कारवाई करण्यात आली असून, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने खंडित करण्यात आले आहे.
महावितरणच्या रामवाडी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता वसंत तानाजी जाधव आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान वीज चोरी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र विद्युत अधिनियम’ मधील कलम १३५ नुसार दंड ठोठावण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर संबंधितांनी हा दंड वेळेत भरला नाही, तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहेत.
अनेक नागरिक सेटलमेंट भागात विजेच्या मुख्य तारेवर बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज गळती होत असून महावितरणला प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय, अनधिकृत जोडण्यांमुळे ट्रान्सफॉर्मरवर (रोहित्र) अतिरिक्त भार वाढून परिसरातील वीज वारंवार खंडित होत आहे. या वीज गळतीमुळे भविष्यात संपूर्ण सेटलमेंट भागात लोडशेडिंग करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
परिसरातील भारनियमन आणि वीज खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारची अवैध वीज चोरी न करता, सर्वांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने स्थानिक जनतेला केले आहे.