

सोलापूर : सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सोलापूर शहरासह केगाव आणि परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी संगमेश्वर महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक यांसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील केंद्राचाही यात समावेश आहे.
परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचे नाव आणि संपूर्ण पत्ता काळजीपूर्वक तपासून घ्यावे. केंद्र शोधण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी वेळेचे नियोजन करावे आणि निर्धारित वेळेत केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा केंद्रांचे समन्वयक डॉ. विकास कडू यांनी केले आहे.