

कामती : सोलापूर-मंगळवेढा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, सर्व्हिस रस्त्याचे काम रखडल्याने अपघातात वाढ झाली आहे. हे रखडलेले काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील सोहाळे फाटा येथील ब्रिजजवळ सोलापूरकडून येणार्या रस्त्यावर सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे अनेक जणांचे अपघात झाले असून, अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
इंचगाव येथे डीबीएल कंपनीचा टोलनाका आहे. टोल नाका प्रशासनाकडे सर्व्हिस रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्ता सुरू करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. याबाबत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी इंचगाव टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याचबरोबर सोहाळे येथील सरपंच ऋषिकेश जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी सोहाळे येथील सर्व्हिस रस्त्याचे काम करावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाची दखल घेतली नाही. सोहाळे येथे रस्ता भूसंपादनातील अडचणींमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने तोडगा काढून सर्व्हिस रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ तसेच प्रवाशांकडून करण्यात येत आहे.