

सोलापूर : टीईटी रद्द करण्यासाठी आज गुरुवारी (दि. ९) पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व संघटनांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंदाजे तीन हजार शाळा आज बंद राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंदोलनात सहभागी झालात तर कठोर कारवाई करू, असा पवित्रा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. टीईटी रद्द करावी, बीएलओ, एसआयआरची कामे शिक्षकांना देऊ नये, १४ मे २०२६ चे शासनाचे पत्र रद्द करावे, जाचक संच मान्यता रद्द करावी, या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. शिक्षक संघ (संभाजी गट) वगळता इतर सर्वच संघटनांचा या आंदोलनात समावेश आहे.
एका दिवसाचे वेतन होणार कपात
शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात करण्यात येईल. त्यामुळे आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आवाहनाकडे दुर्लक्ष करून आंदोलनात सहभागी झाल्यास एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, अशी माहितीही शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.