

मोहोळ : शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचार करणाऱ्या मोहोळ तालुक्यातील शिक्षक नराधमास मरेपर्यंत जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. धनाजी सोपान इंगळे (वयः ४८, रा. पाटकुल ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सदर पिडीता ही शाळेत गेल्यावर तिला शिकवणारे शिक्षक आरोपी धनाजी इंगळे हे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पिडीता हिस वर्गात थांबवून घेवून इतर विद्यार्थ्यांना वर्गाचे बाहेर थांबण्यास सांगून, वर्गामध्येच १२ वर्षाच्या पिडीतेवर शारिरीक व लैंगिक अत्याचार केले. सदरची घटना शाळेशेजारी शेतात काम करण्या-या शेतकऱ्याने पाहिली व त्याला सदरची बाब संशयास्पद वाटल्याने त्याने 2-3 दिवस अगोदरपासून शाळेवर व संबंधित शिक्षकावर लक्ष ठेवले होते.
त्यानंतर दि. १५ एप्रिल २०२३ रोजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतकऱ्याने त्या वर्गामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावला. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळची घटना त्या कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाली. सदरची घटना त्या शेतकऱ्याच्या भावाच्या मोबाईलमध्ये ध्वनीमुद्रित झाली होती. ते चित्रीकरण घेवून, त्या शाळेत जावून मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून त्यांचे समक्ष शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्याने कबूल करावा अशी विचारणा केली असता प्रथमतः कोणीही समोर येण्यास तयार नव्हते. परंतु माझ्याकडे चित्रीकरण आहे असे सांगितले असता आरोपी इंगळे याने स्वतःहून समोर आला व माझ्याकडून चूक झाली मला माफ करा असे बोलला.
ज्या पिडीतेला १४ एप्रिल २०२३ रोजी ज्या शेतकऱ्याने पाहिले होते तिच्या वडीलांना सदरबाबत सांगितले तेव्हा त्यांनी पिडीतेकडे चौकशी केली असता, त्या बालिकेने घाबरुन 4-5 दिवसानंतर शिक्षकाच्या दुष्कृत्याबाबत माहिती दिली. व असा प्रकार त्या नराधमाने तीन ते चार पिडीतांसोबत तीन, चार वेळा केल्याचे उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी मोहोळ पालिस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केली. परंतू तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे इतर पिडीता तसेच चित्रिकरणामध्ये दिसत असणारी पिडीता ही जबाबाचे वेळी आली नाही. परंतु तिने व तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब दयावयाचा नाही असे लिहून दिले.
तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालय, सोलापूर येथे दाखल झाले. चौकशी दरम्यान फिर्यादी, पिडीता, शेतकरी, त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो तसेच डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. इतर पिडीता जरी न्यायालयासमोर अथवा जबाबासाठी आल्या नाही, तरीही एक पिडीता तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पिडीता, चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरुन सदरच्या आरोपीनेच हा गुन्हा केलेला आहे. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे, असा सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम ३५४अ व ३५४ ब प्रमाणे एक वर्ष सक्त मजूरी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे आरोपीस त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व सदरचा दंड पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश केलेले आहेत.
श्री.डी.एन. सुरवसे, ४थे जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी सदर निकालात आरोपीस शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून सौ.शीतल आ.डोके यांनी युक्तीवाद केला, तर आरोपीच्या बाजूने वकील श्री. धनंजय माने यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात मोहोळ पालिस स्टेशनचे पालिस कॉन्स्टेबल (१८९६) राजू पवार व तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी काम पाहिले.