

सांगोला : नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी क्लासेस सूरू झाले आहेत. यामुळे विविध ठिकाणी रोडरोमीओंचा वावर वाढला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे निर्भया पथकाने करडी नजर ठेवून रोडरोमीओवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालक वर्गातून होऊ लागली आहे.
शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड रोडरोमिओ काढतात. यामुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो म्हणून यांची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून रोडरोमीओवर कारवाई करण्यासाठी खास निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत निर्भय पथक फक्त कागदावरच आहे.
महाविद्यालय खाजगी क्लासला भेट देऊन विद्यार्थिनीचे समुपदेश निर्भया पथकाकडून करणे आवश्यक आहे. तसेच या परिसरात फिरणारा रोडरोमीओना समज देणे आवश्यक आहे. पण निर्भया पथक कार्यरत नसल्याने शाळेला येणाऱ्या विद्यार्थिनीची रोडरोमिओमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सांगोला शहर व तालुक्यात अनेक शाळा विद्यालय व खाजगी क्लासेस आहेत. या क्लास साठी व शाळेसाठी शहरांमध्ये ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थ्यांनी शाळेसाठी येतात. या विद्यार्थिनींना शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी रोड रोमिओचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सांगोला पोलीस ठाण्यात निर्भया पथक कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक मोठ्या गावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे निर्भया पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी पालकांतून होऊ लागली आहे.