

सांगोला : सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी परिसरात रविवारी दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे.
चोपडी येथील चौगुले मळा या ठिकाणी काही डाळिंब बागायतदारांचे डाळिंबावरती झाकलेले आवरण वादळी वाऱ्याने फाटून गेले आहे. तसेच फळांवरती गाराचा मारा झाल्याने फळांचेही नुकसान झाले आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या पिकावर आवरण झाकले होते. मात्र आज दुपारी आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक बागांमध्ये आवरण फाटले आहे त्याचबरोबर फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. चोपडी गावातील चौकात असणारा विजेचा खांब कोसळला होता. त्यामुळे चोपडी परिसरात काही काळ वीज खंडित करण्यात आली होती. महावितरण विभागाच्या वतीने विविध ठिकाणी विद्युत खांबांचे, तारांचे नुकसान झाले आहे. त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. एकंदरीत पहिल्याच पावसात चोपडी परिसरातील विविध गावांमध्ये वादळी वाऱ्याने व गारांच्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडून गेली.
मेहनतीचे वेदनेत रूपांतर
वर्षभर प्रचंड मेहनत करून जपलेल्या बागेचे डोळ्यात देखत होणारे नुकसान पाहणे शेतकऱ्यांसाठी प्रचंड वेदनादायी बनले. चोपडी येथील चौगुले मळा येथे असणाऱ्या लक्ष्मण बबन चौगुले यांची डाळिंबाची 700 झाडे फळावरती आली असून त्यावरती असलेले आच्छादन पूर्णपणे फाटले आहे. तसेच 100 च्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळं त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अशोक मधुकर चौगुले यांच्या डाळिंबाच्या बागेवरती केलेले आच्छादन वाऱ्याने फाटून गेले आहे. त्यांचेही नुकसान झाले आहे.