

Sangola Panchayat Samiti
सांगोला : सांगोला पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज बंद करण्यास सांगून कार्यालयाबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीचे उपसभापती अजय सरगर तसेच जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, बाळासाहेब बंडगर आणि बापूसाहेब जावीर यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पंचायत समितीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकामांसाठी ठेकेदारांनी कामे केली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची बिले मागील वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केला. पंचायत समितीवर प्रशासकांची नियुक्ती करताना कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एका प्रशासकाकडे १० ते १३ गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आधीच विकासकामांची बिले थकीत असताना प्रशासकांकडे मोठ्या संख्येने गावांचा कार्यभार देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याचा दावा लवटे यांनी केला. प्रशासकांच्या नियुक्तीमुळे आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्याच्या कारवाईमागील नेमके कारण आणि प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आम्हाला जनतेने त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी निवडून दिले आहे. अधिकारी व कर्मचारी काम करीत नसतील, तर त्यांना कार्यालयात थांबण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज बंद करण्यास भाग पाडले.
- दादासाहेब लवटे, जिल्हा परिषद सदस्य