Solapur Sand Auction : वाळू लिलावावरून शासनाची दुहेरी भूमिका

शासनाकडून लिलावास परवानगी, विभागीय आयुक्तांकडून मात्र उपशावर बंदी
Sand Auction
Sand Auctionpudhari photo
Published on: 
Updated on: 
सुमीत वाघमोडे

सोलापूर : राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना मोठे महत्त्व आले आहे. नदी, नाले, ओढे आणि तलावांमधील गाळ काढणे, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे तसेच भूजल पातळी टिकविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. अशा परिस्थितीत शासनाने अधिकृत वाळू ठेक्यांचा लिलाव करण्यास परवानगी दिली असताना पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये वाळू उपशावर बंदी घातल्याने शासनाच्या भूमिकेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामान्यतः नदीपात्रात पाणी असताना वाळू उपसा करण्यास शासनाकडून परवानगी दिली जात नाही. पाणी ओसरल्यानंतरच नियमानुसार वाळू उपशाची प्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे वाळू उपसा करताना नदीपात्राची स्थिती, पर्यावरणीय परिणाम, भूजल पातळी आणि जलस्रोतांवर होणारा परिणाम यांचा विचार केला जातो. त्‍यामुळे यंदा नदीपात्रात पाणी नसल्याने शासनाने अधिकृत वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्याने प्रशासनातील संबंधित विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये वाळू उपशासंदर्भात वेगळी भूमिका घेत बंदीचे आदेश दिल्याने प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे भूजल पातळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा यामागील प्रमुख युक्तिवाद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामागील सविस्तर आणि ठोस कारणे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही.

विशेष म्हणजे, भूजल सर्वेक्षण विभाग तसेच खनिकर्म विभागाने संबंधित ठिकाणी वाळू ठेक्यांचे लिलाव करण्याबाबत सकारात्मक अहवाल दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका बाजूला तज्ज्ञ व संबंधित शासकीय यंत्रणांचे अहवाल वाळू लिलावासाठी अनुकूल असताना दुसऱ्या बाजूला विभागीय आयुक्तांकडून लिलाव न काढण्याचे आदेश देण्यात आल्याने प्रशासनातील विसंगती अधोरेखित होत आहे.

दुष्काळात जलसंधारण की वाळू उपसा?

दुष्काळी परिस्थितीत नदी, नाले, ओढे आणि तलावांमधील गाळ काढल्यास जलसाठ्याची क्षमता वाढण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनाही गती दिली जात आहे. एकीकडे शासन अधिकृत वाळू लिलावाला परवानगी देत आहे, संबंधित विभाग सकारात्मक अहवाल देत आहेत; तर दुसरीकडे विभागीय आयुक्त पातळीवरून वाळू लिलावास प्रतिबंध केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणातच दोन वेगवेगळ्या भूमिका असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सोलापूरमध्येही निर्णयाचा पेच

सोलापूर जिल्ह्यातील खनिकर्म विभागाने या परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले आहे. शासनाच्या आदेशानुसार वाळू ठेक्यांचा लिलाव काढण्याची प्रक्रिया करायची की विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ती थांबवायची, असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांकडे खनिकर्म विभागाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.