

सोलापूर : शहरातील नवीन आरटीओ कार्यालय परिसरातील समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न करणारी सहा जणांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता, दुचाकी व मोबाईल जप्त केला आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये साहिल, समर्थ, सार्थक गायकवाड, अनिकेत गायकवाड (सर्व रा. सोलापूर,) अजिंक्य चव्हाण (रा. पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर) व एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
घटनेची हकीकत अशी की, 1 नोव्हेंबर रोजी विजापूर रोडवरील समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात तीन दरोडेखोर शिरले. त्यांनी पिस्तूल व कोयत्याने धाक दाखविला व दुकानातील दागिने या बॅगेत भर अशी दमदाटी केली. दरोडेखोरांनी हातातील कोयता काऊंटर वरील काचेला मारला व काच फोडली. दुकानातील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यावेळी ज्वेलर्सचे मालक दीपक दिगंबर वेदपाठक व कामगारांनी आरडाओरड केली. त्यामुळे सर्व दरोडेखोर पळाले. या घटनेची विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद झाली. तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सव्वाशे सीसीटीव्ही फुटेजची रात्रंदिवस पाहणी केली.
पोलिसांनी सर्व आरोपींना शहरातीलच यतीमखाना परिसरातील मैदानात सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता, पिस्तुल, दोन मोटारसायकली व मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींनी दमाणी नगर येथील गोल्ड जीम समोरील मैदानात बसून समर्थ ज्वेलर्सवरील दरोडीचा कट रचल्याचे तपासात उघड झाले. यातील दोघा आरोपींनी यापूर्वी होटगी रोड वरील चौधरी फिलिंग सेंटर (पेट्रोल पंप) वर दरोडा टाकून 39 हजार रूपये लुटले होते. याप्रकरणी वळसंग पोलिसात गुन्हा आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, गुन्हे शाखेच्या उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांच्या पथकतील सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पोलिस पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे यांच्यासह आदींनी केली.