

सोलापूर : सलगर वस्ती परिसरातील असलेल्या खासगी जागेवरील ११८ वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी जागेचे मालक राजेंद्र हजारे यांच्यासह चौघांना पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी एक कोटी २२ लाख २१ हजार रुपयांचा दंड केला. हा दंड १५ दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत.
सलगर वस्ती वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने जागा मालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना नोटीस बजावली होती. त्याची सुनावणी महापालिकेत झाली. या सुनावणीवर पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी निकाल देत राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील, अंकित पाटील यांच्यावर १ कोटी २२ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड निश्चित केला. हा दंड १५ दिवसांत भरण्याचे आदेश दिले. दंड भरला नाही तर त्या जागेच्या सात-बारा उताऱ्यावर त्याचा बोजा नोंद करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात प्रथमच अशा पध्दतीने एवढा मोठा दंड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता विकासकांना झाडे तोडताना परवानगी घेणे अनिवार्य झाल्याचे दिसते.
त्या जागेवर एकूण ११८ वृक्षांची कत्तल केल्याचे पंचनाम्यात नमूद होते. त्यानुसार एका वृक्षासाठी एक लाख रुपये दंड या हिशोबाने एक कोटी १८ लाख रुपये तसेच वन विभागाने केलेला चार लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड असा एकूण १ कोटी २२ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.