

सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध राजकीय पक्ष, शेतकरी व मच्छीमार संघटना रस्त्यावर उतरल्याने सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.
शनिवारी (दि. ३१) सोलापूर शहरात भाजपने एआय डेटा सेंटर समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केले. त्याविरूद्ध पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाजवळ आ. रोहित पवार, खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
एआय डेटा सेंटरच्या समर्थनार्थ भाजपचे आंदोलन
सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपच्या वतीने एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगारनिर्मितीला संधी मिळेल, अशी भूमिका समर्थकांनी मांडली. प्रकल्पाच्या माध्यमातून ४० ते ४२ हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावाही भाजप आ. देवेंद्र कोठे यांनी केला. दरम्यान कोठे, कल्याणशेट्टी यांनी रोहित पवारांवर जोरदार टिकास्त्र सोडले.
विरोधकांनी चार तास रोखला महामार्ग
उजनी धरणाजवळील सोलापूर - पुणे महामार्गावर प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध राजकीय पक्ष, शेतकरी व मच्छीमार संघटनांनी रास्ता रोको केला. यामध्ये आ. रोहित पवार, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. नारायण पाटील, माजी आ. संजय शिंदे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. अभिजित पाटील, आ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे चार तास सुरू होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.