

सोलापूर : शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत विविध ठिकाणच्या रस्त्यांवर काही वाहन मालकांनी बेकायदेशीर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला अहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या गाड्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 2 मे पासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने उभी केली जातात. काही वाहने बेवारस असतात. अनेक दिवसापासून ही वाहने पडून असता त्यांचा कोणीच वाली नसतो. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असून, अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन विभाग व वाहतूक विभागामार्फत संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ही कारवाई दि. 2 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर बेकायदेशीररित्या उभी न करता सुयोग्य वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे. अन्यथा कारवाईअंतर्गत दुचाकी वाहनांसाठी दीड हजार रूपये दंड तर पाचशे रुपये जप्ती व हाताळणी खर्च असा दोन हजार तर चारचाकी वाहनांसाठी पाच हजार दंड आणि दोन हजार जप्त व हाताळणी असा सात हजार खर्च लावला जाणार आहे.