

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील संत दामाजी पुतळा परिसरात अनेक दिवसांपासून रस्ता उखडला असल्याने वाहतूक करताना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे मोटारसायकल आदळून वृद्ध माणसांना किंवा चालकालासुद्धा धक्का बसतो. मोटारसायकलचे देखील नुकसान होऊ शकते. यामुळे संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सध्या आषाढी वारीनिमित्त वाहतूक वाढली आहे. लगतच कर्नाटक भागातून पायी चालत तसेच वाहतूक साधने वापरून लोक या रस्त्याने प्रवास करत आहेत. थोड्या दिवसांनी श्री संत गजानन महाराज यांची पालखी येत आहे. त्यावेळी नगरपालिका प्रशासन सगळीकडे रस्त्याची डागडुजी करीत असते. बोराळे नाका ते पंढरपूर रोड हा मार्ग सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. पंढरपूरकडून येणार्या नेमक्या चौकात हा रस्ता येतो, इथेच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. यामुळे तत्काळ तो रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.