

सोलापूर : रिक्षाचालक अप्पा भुसाळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे बीड येथील प्रवासी महिलेचे लाखमोलाचे साहित्य सुरक्षित राहिले आहे.
बीड येथील विद्या लिंगे या कुमठा नाका येथे पाहुण्यांकडे आल्या होत्या. कुमठा नाका येथून एसटी स्टँडकडे जाण्यासाठी त्यांनी एमएच 13 सीटी 3399 या क्रमांकाची रिक्षा केली.
विद्या लिंगे रिक्षातून सोबत बॅगा आणि पर्स एसटी स्टँड येथे उतरल्या. स्टँडवर तिकीट काढण्यासाठी त्या पुढे गेल्या असता, त्यांची पर्स रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये सुमारे दोन महागडे मोबाईल आणि काही रोकड होती. त्यांनी तत्काळ आपल्या दुसर्या मोबाईलवरून पर्समधील एका क्रमांकावर कॉल केला. रिक्षाचालक अप्पा भुसाळे यांनी रिक्षाच्या मागे पाहिल्यास त्यांना मोबाईलचा आवाज ऐकू आला.
त्यांनी त्वरित फोन स्वीकारून एसटी स्थानकाकडे धाव घेतली. तिथे ट्रॅफिक पोलीस लिंगराज पुजारी यांची भेट घेऊन भुसाळे यांनी त्यांच्या उपस्थितीत ती पर्स विद्या लिंगे यांच्या स्वाधीन केली.रिक्षाचालक भुसाळे यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे ट्रॅफिक पोलीस लिंगराज पुजारी यांनी विशेष कौतुक केले. या घटनेमुळे सामान्य रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा आदर्श सोलापूरकरांसमोर उभा राहिला.