Solapur Crime : रिक्षाचालकाने पोलिसाला नेले फरफटत

जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल
Solapur Crime : रिक्षाचालकाने पोलिसाला नेले फरफटत
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील ट्रॅफिक पोलिसाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून, त्याला ऑटो रिक्षाने फरफटत ओढत नेऊन रस्त्यावर पाडल्याची धक्कादायक घटना शांती चौक येथे घडली आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल राहुल परदेशी (वय २४, रा. ६२, विजय नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. या घटनेत शहर वाहतूक शाखा (सोलापूर उत्तर) येथील पोलीस कॉन्स्टेबल निमग्रे हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्‍वासातच्‍या सुमारास फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल निमग्रे हे शांती चौक परिसरात वाहतूक नियमन करत होते. यावेळी आरोपी विशाल परदेशी हा त्याच्या ताब्यातील ऑटो रिक्षा (क्रमांक एम.एच.१३ सी.टी. ४०५१) भरधाव वेगाने घेऊन जात असताना पोलीस कॉन्स्टेबल निमग्रे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने रिक्षा न थांबवता पुढे नेली. त्यानंतर फिर्यादी पोलिसांनी रिक्षा थांबवून त्यात बसत असताना, चालकाने रिक्षा न थांबवता त्यांना पुढे फरफटत ओढत नेले. एवढेच नव्हे तर पोलिसाचा हात पकडून त्यांना जोरात धक्का देऊन रस्त्यावर खाली पाडले.

या धक्कादायक प्रकारात पोलीस कॉन्स्टेबल निमग्रे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे त्‍यानांतर आरोपी रिक्षा चालक घटनास्थळावरून रिक्षासह पळून गेला. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news