

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात मे महिना संपत आला तरी उन्हाचा तडाखा कायम असून तापमानाने पुन्हा 41.1 अंशांचा टप्पा गाठला आहे. सकाळपासूनच कडक उन्हाची चाहूल लागत असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. उष्ण व कोरड्या वाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले असून आता सर्वांना मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात ढगाळपणा आणि अधूनमधून अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत असली तरी प्रत्यक्षात उकाड्यात कोणतीही मोठी घट झालेली नाही. उलट आर्द्रतेत वाढ झाल्याने वातावरण त्रासदायक बनले आहे. दुपारी बाजारपेठा, प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असून अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत.
कडक उन्हामुळे सर्वाधिक फटका कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले आणि बांधकाम मजुरांना बसत आहे. डोक्यावर उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्यामुळे नागरिकांना थकवा, अंगाची लाही, डोकेदुखी आणि घामाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुपारच्यावेळी शीतपेय, उसाचा रस, लिंबूपाणी आणि थंड पाण्याच्या स्टॉलवर गर्दी वाढत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
मे महिन्यापासून मान्सुनपूर्व पावसाचे आगमन होत असते. त्यामुळे उकाडा सह्य होईल, अशा अपेक्षेवर यावेळी पाणी फे रले गेले. अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळत असतो. मात्र गत पंधरा दिवसांपासून उष्णतामान कायम असल्याने उन्हाळ्याचे चांगलेच चटके सोलापूरकरांना सहन करावे लागले. उष्णतेमुळे वीज वापरातही मोठी वाढ झाली आहे. घराघरांत पंखे, कूलर आणि एसी दिवसभर सुरू असल्याने विजेची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत असून अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पुढील काही दिवस वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. मे महिन्याच्या अखेरीसही तापमानाचा पारा 40 अंशांवर कायम असल्याने सोलापूरकरांना उन्हाच्या झळा आणखी काही दिवस सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे.