

सोलापूर : माजी महापौर स्व. महेश कोठे यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी व अंत्ययात्रेसाठी गेलेल्या तिघांचे ६३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. याप्रकरणी शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एक तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र असल्याचे दिसून येत आहे.
रणजीत संजय कोकाटे (वय २७, रा. राखी अपार्टमेंट, गड दर्शन, दमानी नगर) यांचा ३० हजार रुपये किमतीचा, लक्ष्मीकांत प्रकाश सरगम (वय ३६, रा. अशोक चौक) यांचा २५ हजार रुपये किमतीचा, तर श्रीहरी अंबादास गुर्रम (वय ४५, रा. २२७६ /एच ग्रुप विडी घरकुल) यांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला.
शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात गस्ती पथके वाढवली असून, भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन केला जात आहे.