

सोलापूर : अक्कलकोट रोडवरून रे नगरला जोडणाऱ्या १८ आणि २४ मीटर रुंदीच्या दोन्ही रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करावीत. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५६ कोटी रुपयांचे बीजभांडवल आणि तेथील उद्योगांना अनुदान मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष तथा माजी आ. नरसय्या आडम, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार यांच्यासह विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचे कंत्राटदार अंकुर पांडे ऑनलाईन सहभागी होते.
रे नगरमध्ये मंजूर असलेल्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दोन्ही शाळांची बांधकामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावीत. रे नगरमध्ये शाळेत प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निश्चित करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या ४० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. किमान दोन अंगणवाड्या तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले.
रे नगरसाठी तीन मार्गांवर सिटी बससेवा
रे नगरमधील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन ते रे नगर, जोडभावनी पेठ ते रे नगर आणि बसस्थानक ते रे नगर या तीन मार्गांवर सिटी बससेवा सुरू करण्यासाठी म्हाडा आणि महापालिकेने समन्वयाने कार्यवाही करावी. बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला गॅप फंडिंगचा खर्च म्हाडाने द्यावा. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.