Solapur Rain: बार्शी तालुक्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

वीज कोसळून बैलाचा मृत्यू; आंबा, मोसंबी, ज्वारी कडब्याचे नुकसान
Solapur Rain: बार्शी तालुक्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका
(File Photo)
Published on
Updated on

बार्शी : शहरासह तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील काही गावांना बुधवारी दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. खडकलगाव येथे वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला.

पावसाने आंबा, मोसंबी, ज्वारी कडबा आदी पिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दिवसभर शहर व तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक वातावरण बदलले. पूर्व भागातील पांगरी व उत्तर भागातील आगळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी गारपीट नसली तरी सोसाट्याच्या वाऱ्याने फळबागा झोडपल्या.

आंबा व मोसंबी बागांमधील तयार झालेली फळे वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली. काही ठिकाणी फांद्या तुटल्याने झाडांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या ज्वारी कडब्याच्या गंजी भिजल्याने चारा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. काढणीला आलेल्या भाजीपाला पिकांनाही फटका बसला.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हाता-तोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावला. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आता नुकसानीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतात पाणी साचल्याने पुढील मशागतीची कामेही खोळंबली आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खडकलगाव येथे मुसळधार पावसासह झालेल्या वीज कोसळण्याच्या घटनेत गणपती पट्टू कोळेकर यांच्या मालकीचा बैल जागीच मृत्युमुखी पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news