Solapur Rain: माळीनगर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याचे थैमान

माळीनगर पूर्व भागातील अनेक गावातील केळी पिके व इतर भाजीपाला यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Solapur Rain: माळीनगर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याचे थैमान
Published on
Updated on

माळीनगर : माळीनगर परिसरात शुक्रवारी सोसाट्याचे वादळी वारे वाहत होते. वाऱ्याची तीव्रता पाहता सगळीकडे धुळीचे लोट उठले होते. ज्यामुळे वातावरण अंधारमय झाले होते. दरम्यान सायंकाळी अचानक सुरू झालेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, मोठी झाडे कोसळली. तसेच घरावरील, शेतातील शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच माळीनगर पूर्व भागातील अनेक गावातील केळी पिके व इतर भाजीपाला यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरामध्ये तीव्र उन्हाचा प्रभाव होता. नागरिकांना रोज उकाड्याचा आणि उष्ण वाऱ्याचा सामना करावा लागत होता. अवघ्या काही मिनिटे सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. तर वीज खांब कोसळले आहे. यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच जाहिरात फलक व पत्रे उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

माळीनगर येथील मुख्य रस्त्यालगत असलेली नारळाची झाडे व इतर मोठी वृक्षे रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वीज खांब कोलमडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

संध्याकाळी चार वाजल्यानंतर मध्यम स्वरूपात वारे वाहू लागले आणि अचानक वाऱ्याने गती घेतली. ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक करणारी वाहने नागरिक यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली होती. काही काळ वातावरण गंभीर झाले होते. माळीनगर पंचवटी परिसरातील विद्युत प्रवाहाच्या मुख्य तारा पालखी महामार्गावर वाऱ्यामुळे खाली उतरल्या होत्या. ज्यामुळे विद्युत पुरवठा बराच काळ खंडित करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर असणारे नागरिक आसरा शोधण्यासाठी धावपळ करत होते. बऱ्याच ठिकाणी शेतकरी, सर्वसामान्य यांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेले असून तातडीने प्रशासन पातळीवर पंचनामा होऊन मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news