

दक्षिण सोलापूर : बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पडलेल्या संततधार पावसाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. होटगी सोलापूर प्रमुख मार्गाचा संपर्क तुटल्याने अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेला, कामगार वर्ग कामावर जाऊ शकले नाहीत. आणि शिक्षकही शाळेवर पोचू शकले नाहीत, त्यामुळे होटगी परिसरातील जवळपास सर्वच शाळा बंद राहिल्या.
रात्री साडेअकराला सुरू झालेला पाऊस सकाळी साडेसहा पर्यंत बरसत होता. या पावसाची नोंद होटगीत 100 मिमी तर फताटेवाडीत 169 मिमी इतकी झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे होटगी सोलापूर, होटगी, कुंभारी, औज इंगळगी, शिंगडगाव होटगी, मद्रे कुमठे आदी रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले होते. शेत शिवारात, सखल भागात, मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खरिपाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली, शेताला तलावाच्या स्वरूप प्राप्त झाले होते.