

सोलापूर : गेल्या दीड महिन्यापासून कडक उन्हामुळे तापलेल्या सोलापूर शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने वातावरणात गारवा निर्माण केल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटात शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तापमानात किंचित घट होऊन 40.4 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.
गुरुवारी सकाळपासून प्रचंड उकाड्याने दिवसाची सुरुवात झाली. वातावरणात आर्द्रता कमी होऊन कोरड्या वाऱ्यामुळे तप्त झळा वाहत होत्या. दुपारच्यावेळी रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले आणि पावसास सुरुवात झाली.
पाऊस मान्सूनपूर्वचा असला तरी सरी मात्र पुष्य नक्षत्रातील रिमझिम स्वरूपाच्या होत्या. विडी घरकूल परिसरात पावसाचा शिडकावा झाला. तर पार्क चौक, सात रस्ता, विजयपूर रोड, जुळे सोलापूर, होटगी रोड, कुंभार वेस, मधला मारुती चौकासह शहरातील अन्य भागांत अवकाळी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. शहरात काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने 11 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मान्सूनपूर्वची जोरदार एन्ट्री!
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार एन्ट्री केली असून, येत्या 3-4 दिवसांत राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे.