

अकलूज : मागील काही दिवसांपासून नीरा खोर्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ती दुथडी भरुन वाहू लागली आहे. माळशिरस, अकलूज परिसरातून भीमा नदीला नीरेचे पाणी मिळत आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने नीरा, भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांवरून होणारी वाहतूक बंद केली आहे.
मागील काही दिवसांपासून नीरा खोरे व भीमा खोर्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे सद्यस्थितीत नीरा नदीपात्रात लाटे येथे 26 हजार 525 क्युसेक इतका विसर्ग येत आहे. यामुळे नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भीमा पाटबंधारे विभागाने नीरा नदीला पुराचा इशारा दिला आहे. माळशिरस तालुका प्रशासनाच्या वतीनेही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे नीरा खोर्यातील नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात असणार्या धर्मपुरी, फलटण, बारामती या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. येथील पाणी नीरा नदीत येते. नीरा नदीचे पाणी भीमा नदीला मिळत असल्याने एकंदरीत भीमा नदीलाही पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसामुळे पहिल्यांदाच नीरा नदीला पूर आल्याचे बोलले जात आहे.