

माढा : माढा तालुक्यात सीनेला रविवारी पुन्हा महापूर आला असून उंदरगाव येथे रविवारी जवळपास सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग असल्याने पूरस्थिती जैसे थे आहे. या भागातील प्रमुख रस्ते बंद आहे. सोळाशे कुटुंबातील पाच हजारांहून अधिक लोकांना परत स्थलांतरीत करण्यात आले आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून पुरग्रस्तापर्यंत अन्न पाणी व जनावरांना चारा पोहोच केला जात आहे. अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे.
माढा तालुक्यात आठवड्यात तिसर्यांदा सीना नदीला महापूर आला आहे. सीनेकाठची मुंगशी, लव्हे पासूनच्या खैराव, कुंभेजपर्यंतच्या एकवीस गावात पुराचे पाणी गेले आहे. यामुळे पुरस्थिती कायम आहे. शनिवारी सकाळपासूनच सीनेत परत पाणी वाढण्यास सुरुवात झाली होती. प्रशासनाने पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेत जनावरे व माणसांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याच्या सुचना केल्या होत्या. गावागावात जाऊन प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, सपोनि नेताजी बंडगर हे निवारा केंद्रात जाण्यास आवाहन करत होते. सर्वाधिक पुराचा फटका बसलेल्या दारफळ, सुलतानपूर, वाकाव, केवड उंदरगाव या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर केले गेले.
तालुक्यात 15 गावांत 26 ठिकाणी निवारा केंद्र तयार करण्यात आले असून यामध्ये 1609 कुटुंबातील 5 हजार 122 नागरिकांनी आश्रय घेतला आहे. 25 सप्टेंबर अखेर प्राप्त अंदाजे माहितीनुसार 21 गावातील 3843 घरात पाणी गेले. 701 घरांची पडझड झाली. 129 जनावरे मयत झाली तर 1745 जनावरे वाहून गेली. पुरामुळे 3709 कुटुंब व 13 हजार 448 लोकसंख्या बाधित झाली. पुरामुळे बाधित गावात मोठ्याप्रमाणात आता मदतीचा ओघ सुरु असून यात प्रामुख्याने खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.अभिजित पाटील, माजी आ बबनराव शिंदे, माजी आ धनाजीराव साठे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्याशी संबंधित संस्था व त्यांचे कार्यकर्ते जिल्हा काँग्रेस कमिटी, नाम फाऊंडेशन, डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब, महिला बचत गट,स्थानिक धर्मदाय संस्था, वेगवेगळ्या संघटना, गावोगावचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते हे प्रशासनाच्या बरोबरीने अक्षरशः जीव ओतून काम करत आहेत.