

हंजगी : पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने वीर, गुंजवणी, देवधर, भाटघर आदी अनेक धरण शंभर टक्के भरले आहेत. याचाच परिणाम उजनी धरणावर होऊन उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे. यामुळे उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यात पावसाचा मागमूस नसताना उजनीतील पाण्याने तालुक्यातील हिळ्ळी व तडवळ भागातील बहुसंख्य बंधारे सध्या तुडूंब भरुन वाहताना दिसून येत आहेत.
उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीला येऊन मिळत असल्याने सध्या भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा परिणाम सध्या अक्कलकोट तालुक्यातही दिसून येत आहे. तालुक्यातील हिळ्ळी, खानापूर, आळगे आदी गावांतील बंधारे सध्या तुडूंब भरुन वाहताना दिसून येत आहेत. बंधाऱ्यात सतत वाढणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे भीमा नदीकाठच्या लोकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे.
भीमा नदी प्रवाहात पाण्याचा मोठा विसर्ग येत असल्याने कर्नाटककडे जाणारा गुब्याड, आगरखेड, इंडी, विजयपूर रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उजनी व वीर,भाटघर, देवधर धरणातून मोठा विसर्ग हिळ्ळी बंधाऱ्याजवळ येऊन मिळत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याचे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.
बंधाऱ्यांकडे फिरकू नये
भीमा नदीकाठावर अथवा खानापूर, हिळ्ळी, आळगे आदी बंधाऱ्यांवर लहान मुले, जनावरे, स्टंट करणारे तरुण मुले, फोटो काढणाऱ्यांनी फिरकू नये. सध्या हिळ्ळी बंधारा येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागासह हिळ्ळीचे सरपंच आप्पासाहेब शटगार यांनी केले आहे.