

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात परतीच्या पावसाने दोन आठवडे चांगलाच धूमाकूळ घातला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिली. मात्र, त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात पुन्हा अतिवृष्टीचा अनुभव येत आहे. ओढे, नाले भरुन वाहू लागले आहेत. तर शेती पिके पाण्यात उभी आहेत. काढणीला आलेले मका पीक, ऊस आडवी झाली आहेत. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून हलका ते मध्यम व काहीवेळ जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतातील ताली पाण्याने भरल्या आहेत. तर ओढे, नाले भरुन वाहू लागले आहेत. उसाची पिके पाण्यात आहेत. उसात पाणी जास्त झाल्याने ऊस आडवा झाल्याचे चित्र दिसत आहे. तर काढणीला आलेले मका पीक पावसात भिजत आहे. काही शेतकर्यांनी मोडणी केलेल्या मक्याचे नुकसान होत आहे. तसेच डाळींब, पेरु, बोर या फळबागांना फटका बसला आहे. फळबागांवर औषध फवारणी करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे फळबागांवर पाऊस व औषध फवारणी न करता आल्यामुळे पिके नष्ट होत आहेत.
सखल भागात पाणी साचले आहे. विहिरी तुडूंब भरल्या आहेत. विहिरींना पाझर लागले आहेत. रस्त्यावरुन पाणी वाहू लागले आहे. या पावसामुळे शेतरस्त्यांची दैना उडाली असून वाडीवस्तीवरील नागरिकांना, शेतकर्यांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पावसाचा ऊस शेतीला फायदा होत असला तरी अतिवृष्टी झाल्यामुळे उसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे आता पाऊस नको, असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
कमी झालेले पाणी पुन्हा वाढले
बुधवार व गुरुवारी दोन दिवस पावसाने तालुक्यात उघडीप घेतली होती. त्यामुळे शेती पिकातील पाणी, ओढ्याचे पाणी कमी होऊ लागले होते. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी दिवसभर पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहत आहेत. मोठमोठ्या शेताच्या ताली भरुन वाहत आहेत. यामुळे विहिरीदेखील तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत.