

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाऊस आणि पुराने थैमान घातले आहे. भीमा व सीना या दोन प्रमुख नद्यांसह इतर छोट्या नद्यांंना पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची पूरस्थिती उद्भवली आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि नद्यांच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये दोन लाख क्युसेक पाणी येत आहे. सीना नदीने रौद्ररूप धारण केले असून हजारो हेक्टर शेतात पाणी शिरले. नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली गेली. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना प्रचंड फटका बसला. सोलापूर-पुणे महार्गावरील लांबोटी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर तसेच रेल्वे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.
सोलापूर-विजापूर महामार्गावरील वडकबाळ येथे पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील मोठ्या पुलाला पाणी येऊन टेकले. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील तिर्हे येथेही राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलापर्यंत पाणी पोहचले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक हजार शाळा बंद
अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात सहा तालुक्यांतील एक हजारहून अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी असल्याचे चित्र मंगळवारी (दि. 23) जिल्ह्यातील अनेक भागात दिसले. शाळा, महाविद्यालये बुधवारीही (दि. 24) बंद राहण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक हजारांपेक्षा जास्त शाळा बंद ठेवण्यात आल्या, अशी माहिती, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
बचाव कामासाठी सैन्याचे पथक येणार
जिल्ह्यात शोध आणि बचावकार्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची एक तुकडी सोलापूर जिल्ह्यात पाठवावी, अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आर्मीच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मुख्यालयास केली. त्यानुसार सैन्याचे पथक लवकरच सोलापुरात येणार आहे.
विविध बचाव पथकांची नियुक्ती
माढा तालुक्यात एनडीआरएफ, लष्करी पथकांची नियुक्ती केली आहे. त्या पथकांकडून बचाव, मदतकार्य सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे पूरस्थिती आहे. त्यामुळे तातडीने शोध व बचावकार्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे.