

सोलापूर : गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर शहर-जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मंगळवार, दि.27 दुपारी तीननंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.
मागील अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच कृत्तिका नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रोहिणी नक्षत्रातील पावसाची संततधार सुरूच असल्याने सोलापुरकरांना ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यांचा अनुभव घ्यावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने नागरिक हैराण झाले असून, केव्हा पाऊस थांबणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र, त्यातच आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने येत्या काही दिवस पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून शहर-जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिक पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याने बोरगावकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे बराच वेळ रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने थांबून होती.
जिल्ह्यातील शेतकरी एप्रिल, मे महिन्यांत शेतीची मशागत करत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने हजारो एकरवरील शेतीची मशागत थांबली आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले.