

सोलापूर : तब्बल अकरा दिवसांपासून शहर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत, अनेक झोपडपट्ट्यांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील फळ पिकांना बेसुमार फटका बसला आहे. या पावसावर पेरण्या कराव्या अशीही स्थिती नाही, कारण पाऊसच इतका झाला आहे की आणखी पंधरा दिवस तरी वाफसा येणार नसल्याची स्थिती आहे. वीज, वादळ यामुळे काहीठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यात साधारणतः 14 मे पासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व मौसमी, अवकाळी पाऊस असेल म्हणून पहिल्याप्रथम सर्वांनीच पावसाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. मात्र, त्या दिवसापासून आज तब्बल अकरा दिवस झाले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. यामुळे मात्र सर्वांचीच दाणादाण उडाली आहे.
केळी, डाळिंब, पेरू, आंबा या फळपिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कांद्याचेही यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. छाटलेल्या द्राक्ष बागांवर कपरा, डावणी रोग पडण्याची शक्यता या पावसाळी वातावरणामुळे निर्माण झाली आहे. खरे तर या काळात कडक उन असते. मात्र सध्या ते नसल्याने द्राक्ष काडीत गर्भधारणा होईल की नाही याची खात्री नसल्याचे द्राक्ष उत्पादक सांगत आहेत. काहींनी पावसाळ्याच्या तोंडावर म्हणून शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली होती. ती कामेही आता खोळांबली आहेत. काही शेतकर्यांची नांगरणी पूर्ण झाली आहे. त्यांच्यादृष्टीने हा पेरणीसाठी उत्तम काळ होता. परंत सलग कोसळणार्या पावसामुळे आणखी किमान पंधरा दिवसतरी वाफसा होणार नसल्याची सद्यस्थिती आहे.
सोलापुरातील दक्षिण - उत्तर कसबा, चौपाड, नवीपेठ, हांंडे प्लॉट, कुंभार वेस, लोभा मास्तर चाळ, वसंत विहार, उमा नगरीसह विविध सखल भागात अक्षरशः तळे निर्माण झाले आहेत. सततच्या पावसामुळे या भागातील रस्त्यांवरील पाणी हटण्याचे नावच घेईना. असे असले तरी मे महिन्यात शहरातील असंख्य बोअर आटतात. त्यामुळे अपार्टमेंटवासियांना पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र यंदा तो त्रास झाला नाही.