

सोलापूर : सोलापूर रेल्वेस्थानक स्वच्छतेत मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत अव्वल ठरले आहे. तशी माहिती सोमवारी (दि. २३) सोलापूर विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या २०२४ च्या विशिष्ट रेल सेवा पुरस्कार कार्यक्रमासाठी सोलापूर रेल्वे विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय कार्यक्षमता स्वच्छता आणि गुणवत्ता क्षेत्रामध्ये विभागाने देश पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे.
सोलापूर रेल्वे विभागाला एकूण तीन प्रमुख विभागीय कार्यक्षमता शिल्ड मिळाले आहेत. यात सोलापूर स्थानकाला विभागातील मोठ्या स्थानकाच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट स्वच्छ रेल्वेस्थानक, वक्तशीरपणा शिल्ड, ईएनएचएम शील्ड असे तीन प्रमुख पुरस्कार सोलापूर रेल्वे विभागाला मिळाले. शिवाय अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार मिळाले आहेत.
सोलापूर रेल्वे विभागाला मिळालेले हे सर्व पुरस्कार म्हणजे सोलापूर रेल्वे विभाग प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. हा गौरव सोलापूर विभागाच्या उच्च दर्जाच्या रेल्वे सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने केलेल्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकतो. सदरचा हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृह, मुंबई येथे पार पडणार आहे.