

माढा : माढा ते वाकाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेच्या धडकेत रविवारी दुपारी सव्वादोन वाजता दोन मजूर ठार झाल्याची घटना घडली.
राहुल बेंजरपे (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) व विजय कैय्यावाले (रा. सदर बझार, सोलापूर) अशी त्या रेल्वेच्या धडकेत ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत. धडकेनंतर उपचारासाठी त्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की, वाकाव गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करत असणारे दोघे मजूर पॅसेंजर रेल्वे गाडीने सोलापूरहून वाकावकडे रेल्वेने येत होते.
दरम्यान, वाकाव स्टेशन आल्याचे त्यांना समजले नाही. पुढे माढा स्टेशनला ते उतरले व रेल्वे ट्रॅक शेजारून चालत वाकाव स्टेशनकडे निघाले. समोरून पंढरपूर-म्हैसूर रेल्वेगाडी येत होती. या रेल्वेच्या इंजिनचा धक्का राहुल बेंजरपे व विजय तैय्यावाले यांना बसला. जोराचा धक्का बसल्याने दोघेही बाजूला नाल्यात फेकले गेले. राहुलचा जागीच मृत्यू झाला. तर विजय गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सोलापूरला उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.