

मोहोळ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी कुटुंबाला तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी काठीचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून चोरटे पसार झाले. बुधवारी (दि. २५) मध्यरात्री एकच्या सुमारास यावली (ता. मोहोळ) गावाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर विठ्ठल फाळके (रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) हे कुटुंबीयांसह पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी यावली येथील हॉटेल सोलापूर इनच्या पूर्वेस सुमारे ५०० मीटर अंतरावर रात्री एकच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे टायर बदलण्यासाठी त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले.
याचवेळी तीन ते चार अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी काठीचा धाक दाखवत फाळके आणि त्यांच्या कुटुंबीयांना हाताने मारहाण केली. त्यानंतर वाहनातील दोन महिलांच्या अंगावरील सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच किशोर फाळके यांच्या खिशातील तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. लुटीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी अज्ञात तीन ते चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर घडलेल्या या लुटीच्या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.