

सोलापूर/ ठाणे : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर, जानेवारी महिन्यात संपली आहे. काही ग्रामपंचायतींची मुदत फेबु्रवारीच्या अखेरीस संपत आहे. या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागातर्फे 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचना केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 1,140 पैकी मुदत संपलेल्या 701 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील 50 ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या सुरुवातीला पोटनिवडणुका होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिलमध्ये या पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासक नेमण्याची प्रक्रीया सुरु केली जात होती. मात्र, विद्यमान सरपंचांनी निवडणूक घ्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
अंतिम प्रभाग रचना होणार 4 मे रोजी प्रसिध्द
ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागवण्यासाठी 7 एप्रिल 2026 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांना आपल्या हरकती 13 एप्रिल 2026 पर्यंत नोंदवता येतील.प्राप्त हरकतींवर 21 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून 28 एप्रिल 2026 पर्यंत प्रभाग रचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल. तर दि.4 मे 2026 रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिध्द करणार आहे.
थेट जनतेतून होणार सरपंच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच निवडीसाठी आणलेली जनतेतून सरपंच ही पद्धत या निवडणुकीत वापरली जाणार आहे. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघाली आहेत. त्यातच आता प्रभाग रचनेची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, गावागावातील नेत्यांकडून सरंपच पदासाठी तयारीला वेग येणार असून, थेट जनतेतून सरपंच होणार असल्याने अनेकजण इच्छूक झाले आहेत.