

सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजपवर डिलिमिटेशन विधेयकावरून जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यास ती केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी केलेलीच नव्हे तर देशाशीही केलेली गद्दारी असेल, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला या विधेयकाचे समर्थन करण्याची एवढी मजबुरी का आहे, असा सवालही उपस्थित केला.
खा. शरद पवार यांना राज्यसभेची जागा देण्यासह विविध राजकीय प्रसंगांत काँग्रेसने नेहमीच त्यांना साथ दिली. मात्र आता डिलिमिटेशनसारख्या देशाच्या हिताच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका बदलत असेल, तर ही देशाशी केलेली गद्दारी ठरेल. पुरोगामी विचार, शाहू-फुले यांची विचारधारा आणि संविधानावर विश्वास ठेवून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिले आहे. मात्र पक्षाची सध्याची भूमिका याच विचारांच्या विरोधात जाणारी असल्याची टीका खा. शिंदे यांनी केली. महिला आरक्षणासाठी खासदारांची संख्या वाढवण्याची गरज काय, असा सवाल करत ५४३ जागांमध्येच ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार फोडण्यासाठी पैशांची ऑफर?
महाराष्ट्रातील खासदार फोडण्यासाठी ५० कोटी रुपये, तर अन्य ठिकाणी १५० कोटी रुपयांची ऑफर असल्याची चर्चा आपण समाजमाध्यमांवर ऐकल्याचे खा. शिंदे म्हणाल्या. भाजपकडून अशा प्रकारची कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांमध्ये संभ्रम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही खासदारांशी आपले बोलणे झाले असून त्यांच्या भूमिकेत संभ्रम दिसत असल्याचे खा. प्रणिती शिंदे यांनी सांगितले. पक्षाच्या भूमिकेविरोधात जाण्याची हिंमत खासदारांनी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आ. जितेंद्र आव्हाड यांची भाषणे संविधानाला धरून असतात. मात्र तेही दबावाखाली भूमिका बदलत असतील, तर त्यांच्या मतदारांसाठी ही शोकांतिका असल्याचेही त्या म्हणाल्या.