Praniti Shinde : नद्यांवर बॅरेज उभारण्यासाठी डीपीआर तयार करा

खा. प्रणिती शिंदे; उमराणी-सादेपूरच्या धर्तीवर मोठ्या पाणी साठवण क्षमतेचे बॅरेज उभारणार
Praniti Shinde : नद्यांवर बॅरेज उभारण्यासाठी डीपीआर तयार करा
Published on: 
Updated on: 

मंगळवेढा : पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांतील भीमा व सीना नदीवर मोठ्या पाणी साठवण क्षमतेचे बॅरेज उभारण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. मी शासन स्तरावर या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करेन, अशी ग्वाही खा. प्रणिती शिंदे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीवर अधिक पाणी साठवण क्षमता असलेले नवीन बॅरेज उभारण्यासाठी खा. प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने खा. शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उमराणी-सादेपूर येथे कर्नाटक सरकारने बांधलेल्या बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उमराणी-सादेपूरच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे बॅरेज उभारण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत खा. प्रणिती शिंदे यांनी कर्नाटक हळदी वरील बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, रणजितसिंह पाटील, सिद्धेश्वर डोके, प्रमोद पुजारी, महेश चव्हाण, रवींद्र पुजारी, लिंगप्पा सोनगे, सिद्धाराम कोळी, महादेव कोळी, दिनेश सोनगे, शेखर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे केवळ मॉडिफिकेशन करण्याऐवजी अधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या नवीन बॅरेजचे नियोजन करण्यात यावे. यासाठी सहाही तालुक्यांतील भीमा व सीना नदीवरील संभाव्य ठिकाणांचे सर्वेक्षण करून डीपीआर तयार करावा. या प्रकल्पांची संपूर्ण तांत्रिक माहिती मला द्यावी. मी शासन स्तरावर या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करेन, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस बागायती क्षेत्र वाढत आहे. भविष्यात शेतीसाठी पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात महापुरामुळे भीमा व सीना नदीचे अतिरिक्त पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून त्याचा अधिकाधिक साठा करता यावा, यासाठी उमराणी-सादेपूर बॅरेजच्या धर्तीवर मोठ्या साठवण क्षमतेचे बॅरेज उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होईल.
- खा. प्रणिती शिंदे, खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.