Solapur Politcs | ...तर दहा कुंकवांच्या बळाचे काय?

सोपलांच्या भावनिक उल्लेखाला पालकमंत्री गोरे यांची मिश्किल कोटी
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Published on
Updated on
मदन चवरे

माढा : अमेरिकेत हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी मायदेशी परतलेल्या बबनदादा शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर राजकीय रंग चढला. या सोहळ्यात कौटुंबिक जिव्हाळ्याच्या एका भावनिक उल्लेखाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मिश्किल शैलीत राजकीय कोटीची फोडणी दिल्याने सोहळ्यातील वातावरणच बदलून गेले.

या कार्यक्रमात बबनदादांचे जुने मित्र आणि त्यांच्या राजकीय वाटचालीचे सुरुवातीपासूनचे साक्षीदार असलेले आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बबनदादांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या सौभाग्यवतींचे योगदान अधोरेखित करताना सोपल यांनी ‘एका कुंकवाच्या बळावर’ बबनदादा एवढा प्रदीर्घ प्रवास करू शकले, असा भावनिक उल्लेख केला.

सोपल यांच्या या वक्तव्यामागे राजकीय टोमणा नव्हता. बबनदादांच्या सार्वजनिक जीवनातील चढ-उतार, कुटुंबाची साथ आणि विशेषतः पत्नीने दिलेला खंबीर आधार याचा गौरव करण्याचा तो भावनिक संदर्भ होता. मात्र, व्यासपीठावर उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याच ‘एका कुंकवाच्या बळा’चा धागा पकडत त्याला मिश्किल राजकीय वळण दिले.

‘एका कुंकवाच्या बळावर बबनदादा टिकले आहेत; मग ज्यांच्या मागे दहा कुंकवांचे बळ आहे, त्यांचे काय?’ अशा आशयाची टिप्पणी गोरे यांनी करताच सभेत हास्याची लाट पसरली. सोपलांच्या भावनिक वक्तव्याला गोरे यांनी दिलेली ही राजकीय कोटी उपस्थितांसाठी अनपेक्षित असली तरी चांगलीच रंगली.

माढ्याच्या राजकारणात बबनदादा शिंदे यांचा प्रदीर्घ प्रभाव राहिला आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे त्यांनी जवळून पाहिली असून, बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या अमृतमहोत्सवाला जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि त्यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध यांनाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news