

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा कोठे घराण्याची सत्ता ठळकपणे दिसू लागली आहे. अवघ्या एक ते दीड वर्षांच्या कालावधीत देवेंद्र कोठे यांनी भाजपवर आपली पकड मजबूत करत पक्ष ताब्यात घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांच्या गटातील महापौर विराजमान झाल्याने महापालिकेत पुन्हा एकदा कोठे पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एक काळ असा होता की, स्व. विष्णुपंत कोठे बोलले आणि महापालिका चाले. स्व. महेश कोठे यांनी महापालिकेची सूत्रे आपल्या हाती ठेवत राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित केले. महेश कोठे यांच्या निधनानंतर अनेकांनी कोठे घराण्याचा प्रभाव संपेल असा अंदाज बांधला होता. मात्र, देवेंद्र कोठे यांनी तो अंदाज सपशेल चुकीचा ठरवला. महत्त्वाचे म्हणजे, पूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता उपभोगणाऱ्या कोठे परिवाराने आता भाजपमध्ये प्रवेश करून आपला राजकीय करिष्मा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला आहे.