

मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवक इच्छुकांची नेत्यांकडे वर्दळ लागली असून ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणामुळे दीर्घकाळ लांबलेली मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपचे 11 तर शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह 8, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 1 नगरसेवक असे पक्षबल निवडून आले आहे. मात्र उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत 1 नगरसेवक पदाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्याकडे बहुतांश इच्छुकांची वर्दळ वाढलेली आहे. तर शिंदे शिवसेनेचे रमेश बारसकर 1 स्वीकृत नगरसेवक जागेवरती सकल मराठा इच्छुक कार्यकर्त्याला संधी देणार की ओबीसीला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपमधून एकाला तर शिवसेनेतून एकाला अशी दोघांना संधी मिळणार आहे. त्यासाठीही आपापल्या नेत्यांकडे संबंधितांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील हे निष्ठावंत नगरसेवकास उपनगराध्यक्षपदाची संधी देणार की, नव्यानेच हातमिळवणी केलेल्या नगरसेवकास संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी शिंदे शिवसेनेचे रमेश बारसकर कोणाला संधी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.