

सोलापूर : सोलापूर शहरात काँग्रेस आणि भाजपमध्ये ऐन दिवाळीत सुरू झालेला राजकीय वाद आता विकोपाला गेला आहे. लोकप्रतिनिधींनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर एकमेकांवर घसरवलेली शाब्दिक पातळी आणि आव्हानात्मक भाषेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते थेट समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला.
भाजपच्या लोकशाही बचाव पदयात्रेदरम्यान आ. देवेंद्र कोठे यांनी खा. प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी सकाळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि त्यांच्या समर्थकांनी देवेंद्र कोठे यांचा शिवराळ भाषेत उल्लेख केला व त्यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन केले. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद सुरु झाला.
गुरुवारी रात्री आ. देवेंद्र कोठे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करीत चेतन नरोटे यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर वाद सुरु झाला. रात्री १ च्या सुमारास या वादाने हिंसक वळण घेतले. आ. देवेंद्र कोठे हे थेट चेतन नरोटे यांच्या 'इंद्रधनु सोसायटी' येथील निवासस्थानी पोहोचले. तिथे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हुर्रेबाजी, शिवीगाळ आणि एकेरी भाषेत वाद सुरू झाला.
या गोंधळामुळे संपूर्ण कॉलनी मध्यरात्री जागी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने गोळा झाल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही पक्षपातीपणाचे आरोप केले. अखेर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा हायड्रॉमा पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले. ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांनी सोलापूर हादरल्याचे दिसून आले. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा पर्यंत कुठेच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
शहरात ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त
मध्यरात्रीच्या राड्यानंतर शुक्रवारी सकाळपासून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आ. देवेंद्र कोठे यांचे राधाश्री निवासस्थान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे निवासस्थान, काँग्रेस भवन, रामलाल चौक आणि भैय्या चौक याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
कोठे समर्थकांची काँग्रेस भवन समोर घोषणाबाजी
आ. कोठे यांच्या चिडलेल्या समर्थकांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास काँग्रेस भवन समोर घोषणाबाजी केली. प्रथम चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलन करण्यात येणार होते, परंतु ऐनवेळी सर्व युवक कार्यकर्त्यांनी त्यांचा मोर्चा काँग्रेस भवनाकडे वळवला. त्याठिकाणी आ. देवेंद्र कोठे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी काँग्रेस तसेच सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, चेतन नरोटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी लागलीच आंदोलकांना ताब्यात घेतले.