

सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोडवर दोन पिस्टल व दहा जिवंत काडतुसासह दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विक्री करण्यासाठी हे पिस्टल आणले होते. दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर गुन्हे शाखेतील पोलिस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अवैध पिस्टल विक्री करण्यासाठी दोन इसम अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवर जवळ थांबले आहेत. ही माहिती त्यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली. त्यानुसार माने यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठविले. या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकीवर असलेल्या दोघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यातील एकाकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन काडतुसे तर दुसर्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि आठ काडतुसे आढळून आली.
सचिन सिध्दाराम झगळघंटे (वय 39, रा. कर्देहळ्ळी रोड, कुंभारी, ता.द.सोलापूर) आणि फरहान अखिल शेख (वय 19, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी, ता. द. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रमेश विश्वनाथ धूळ (सध्या रा. कुंभारी, मूळ रा. कर्नाटक) हा पळून गेला. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, एक बोलेनो कार, एक मोटारसायकल असा 10 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसआयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. आश्विनी पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने उपस्थित होते. ही कामगिरी दत्तात्रय काळे, भारत पाटील, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, सिध्दाराम देशमुख, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.