

सोलापूर : एस.टी. स्टॅण्डवर चोरी करणार्या आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक करत त्याच्याकडून पावणेपाच लाखांचे दागिने हस्तगत केले. अजयकुमार बजरंगलाल सांसी (वय 26, व्यवसाय मजुरी, रा. किरोरी, जि. हिसार, हरियाणा) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
परमेश्वर नरसप्पा बेळे (रा. मुंबई) हे मूळ गावी धारशिव येथे आले होते. त्यानंतर 14 मे रोजी सहकुटुंब मुंबई येथे जाण्यासाठी सोलापूर एस.टी. स्टॅण्डवर आले होते. सोलापूर पुणे बसमध्ये त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बॅगेतील चार लाख 76 हजार रुपयांचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुुनील दोरगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पाहताना एका इसमावर संशय बळावला. तो आंतरराज्य गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली.सदर चोरी अजयकुमार बजरंगलाल सांसी याने केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळाले. त्यानंतर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी तपास पथकास हरियाणा येथे जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने त्यास हरियाणा येथून अटक करून चार लाख 76 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश खेडकर, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, फरदिन शेख, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.