

पिलीव : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शेतकरी लक्ष्मण मुरलीधर वगरे यांच्या सुळेवाडी हद्दीतील दीड एकर उसाला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी विहिरीतून पाणी आणून प्रयत्न केला आहे, मात्र असफल झाला.
उसाच्या वरून गेलेल्या विद्युत वाहिनीत एकमेकीला घर्षण होऊन उसाच्या उभ्या पिकावर ठिणग्या पडल्या. दीड एकर उसाला आग लागून सदरचा ऊस जळून खाक झाला. घटनेची पाहणी पिलीव विभागीय वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता गडगे व त्यांच्या टीमने जळालेल्या उसाची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानीचा अहवाल पाठवीत असल्याचे सांगितले. तसेच महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी संकेत खाडे यांनीही सदर जळक्या उसाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला.
राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याकडे आपत्तीग्रस्त शेतकरी लक्ष्मण मुरलीधर वगरे सभासद असल्याने जळीत उसाचा रिपोर्ट चेअरमन शेषागिरी राव यांच्याकडे पाठविला आहे. त्यांनी जळालेला ऊस तातडीने तोडण्याचे आदेश कारखान्याच्या शेती विभागाला दिले आहेत.