

मोहोळ शहर : आष्टी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी ‘टेल टू हेड’ पद्धतीने सोडण्यात यावे, तसेच मोहोळ तालुक्यातील पाटकुल व आढेगाव येथील तलाव आणि बंधारे तातडीने भरून देण्यात यावेत, यासह विविध मागण्यांसाठी पाटकुल येथील काळेवाडा कॅनॉलजवळ सुरू असलेल्या प्राणांतिक उपोषणाचा मंगळवारी आठवा दिवस होता. त्यांच्यासह चार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सलग आठ दिवस अन्नत्याग केल्याने जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.पाटकुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपोषणस्थळीच देशमुख यांच्या प्रकृतीची तपासणी करून उपचार करत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांसह शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.
पाणी चोरी रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त
कॅनॉलमधील पाण्याची चोरी रोखण्यासाठी व आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कालव्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू राहावा, यासाठी जलसंपदा विभागाने महावितरणला लेखी सूचना दिल्या आहेत. सिंचनासाठी आवश्यक पाणी योग्य पद्धतीने व नियोजनानुसार उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.