

सोलापूर : सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील दहावी बोर्डाच्या भूगालाचे पेपर चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास सांगोला पोलिसांनी चोवीस तासांत पकडले. त्याने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याकडून प्रश्नपत्रिका व तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला विद्यामंदिरातील कस्टडी रूममधून दहावीचे भूगोलाचे पेपर चोरीला गेल्याने राज्यात खळबळ उडाली होती. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून तपास सुरू केला. या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक पुराव्यावरून माहिती काढली. त्यात गुन्हा एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त मुलाने केल्याचे समोर आले. या मुलाची त्याच्या पालकांसमोर चौकशी करण्यात आली.
यामध्ये त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यासाठी वापरलेले इलेक्ट्रिक कटर, मोटार सायकल, चोरलेल्या प्रश्नपत्रिका, तीन उत्तर पत्रिका जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे, विजय शिंदे, वाघे, भाऊसाहेब गोसावी यांच्या पथकाने पार पाडली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.