Solapur News: सोलापुरात भाजपविरुद्ध विरोधक महापौरपदासाठी आमने-सामने

भाजपकडून महापौर पदासाठी कोंड्याल, उपमहापौर पदासाठी देवकर रिंगणात
Solapur
SolapurPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या 39 व्या महापौरपदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी (दि. 6) पार पडणार आहे. यासाठी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौरपदासाठी भाजपच्या वतीने विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात एमआयएम आणि शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. बहुमत असल्याने भाजपने बिनविरोधसाठी प्रयत्न के ला नाही. त्यामुळे मतदान अटळ असल्याचे बोलले जात आहे.

महापौर निवडीपूर्वी भाजपकडून सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, सकाळी 10 वाजता दिनदयाल उपाध्याय सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी सर्व नगरसेवकांना शहराध्यक्ष रोहणी तडवळकर यांनी व्हिप बजावला आहे. महापालिकेत होणाऱ्या या बैठकीत सर्वप्रथम सभागृहनेते नरेंद्र काळे नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये महापौर निवडीसाठीची मतदान प्रक्रिया, मतदान करताना कोणत्या पद्धतीने सहभाग घ्यायचा, तसेच उपमहापौर निवडीची संपूर्ण कार्यपद्धती सविस्तरपणे समजावून सांगितली जाणार आहे.

तत्पूर्वी गुरूवारी भाजपच्या सर्व नगरसेवकांची सारस्वत मंगलकार्यालात बैठक झाली. या बैठकीत शहराध्यक्ष तडवळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत नगरसेवकांनी सकाळी दहा वाजता सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

निवड प्रक्रियेबाबत शिस्तबद्ध तयारी

भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पक्षाकडून निवड प्रक्रियेबाबत शिस्तबद्ध तयारी करण्यात येत आहे. दरम्यान या महापौर निवडणुकीत विरोधी पक्षही सक्रिय झाले आहेत. शिवसेना, एमआयएम पक्षाने निवडणुकीत सहभाग घेत उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खरोखरच मतदान प्रक्रिया पार पडते की शेवटच्या क्षणी माघार घेतली जाते, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून जय्यत तयारी

प्रशासनाकडून महापौर निवडीची तयारी पूर्ण केली आहे. महापौर, उपमहापौर यांचे कार्यालयात सजवण्यात आले आहे. गाड्या ताब्यात घेऊन त्या सजवण्यात आल्या आहेत. महापालिका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ओळपत्राशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही.

विरोधक माघार घेणार का..?

महापालिकेत भाजपचे 87, शिवसेनेचे चार, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून, स्पष्ट बहुमत असतानाही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते निवडणूक रिंगणातून माघार घेतात की प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जातात हे महापौर, उपमहापौर निवडीच्या काही मिनिटे आधी कळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news