

गुळवंची : तालुक्यातील अनेक गावात महावितरणच्या विद्युत वितरण पेटीचे दरवाजे उघड्या अवस्थेत असून, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. उघड्या पडलेल्या या डीपींमुळे अपघाताची टांगती तलवार असून, महावितरण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
गुळवंची येथे जिल्हा परिषद शाळेजवळील, बस स्थानक व गावशेजारील असलेल्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत किंवा ते उघडेच सोडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये फ्यूज न लावता मोठ मोठ्या तारा लावण्यात आलेल्या आहेत. विशेषतः खेळणारी लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यासाठी हे उघडे डेथ ट्रॅप ठरत आहेत.
केवळ सुरक्षिततेचा प्रश्नच नाही, तर या उघड्या डीपींमुळे धुळीचे साम्राज्य, पाऊस आणि कचरा आत जाऊन शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे वारंवार विजेचा खोळंबा होत असून तासनतास वीज पुरवठा खंडित राहत आहे. वारंवार वीज खंडित झाल्यामुळे घरगुती उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे कर्मचारी केवळ थातूरमातूर दुरुस्ती करून निघून जातात, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामात होणारी टाळाटाळ होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
महावितरणने तातडीने या उघड्या डीपींचे सर्वेक्षण करून त्यांना नवीन दरवाजे बसवावेत आणि सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या लावाव्यात. जर येत्या काळात कोणतीही जीवितहानी झाली, तर त्यास सर्वस्व महावितरण प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.