

सोलापूर : बहुचर्चित सोलापूर-गोवा, सोलापूर-पुणे, सोलापूर-मुंबई या मार्गावरून विमान सेवा सुरू होण्यास अजूनही मूहूर्त लागत नाही. होटगी रोड विमानतळ परिसरातील परिस्थितीमुळे ७२ आसन क्षमता असलेल्या विमान सेवेला परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात ५५ ते ६० प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी असेल अशी माहिती प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई, सोलापूर-पुणे, सोलापूर-तिरुपती या चारही ठिकाणाहून होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर-गोवा ही सेवा येत्या १५ दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. होटगी रोड विमानतळाचे नूतनीकरण करून त्याचे उद्घाटनही होऊन चार महिने उलटून गेले आहेत. अद्यापही विमान सेवा सुरू झाली नाही. व्यावसायिक विमानसेवेसाठी ४२ आसन क्षमता विमानसेवा परवडत नसल्याने फ्लाय ९१ या विमानसेवा कंपनीने ७२ आसन क्षमता विमानसेवा सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. त्याला डिजीसीआयने परवानगी दिली आहे. विमानतळाच्या परिसरात असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आणि इतर इमारतींना पांढरा आणि लाल रंगाने रंगविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने ते काम सुरू आहे.
होटगी रोड विमानतळावर पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल. ब्रॉऊझरमधून पेट्रोल वाहतुकीसाठी परवानगी मिळाली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.