

सोलापूर : उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शंभर मीटरचे काम शिल्लक आहे. शंभर मीटर परिसरात धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आडवी आली आहे. या पाईपलाईनच्या खालून सोलापूरची पाईपलाईन घालावी लागणार आहे. यासाठी धाराशिवच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेऊन काम करावे लागणार आहे. या कामासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने रविवारी (दि. 11) समांतर पाईपलाईनची चाचणी घेतली जाणार आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे. तब्बल 110 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उजनी धरणाजवळ शेतकर्यांनी काम अडवल्यामुळे 300 मीटर काम शिल्लक राहिले होते. पोलिस बंदोबस्तात हे काम चालू केले. मात्र पाईपलाईनचे काम करताना इतर शेतकर्यांच्या पाईपलाईनचे जाळे तीनशे मीटर परिसरात असल्याने काम करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. आता हे कामही पूर्ण झाले आहे. फक्त 100 मीटर काम शिल्लक आहे.