

सोलापूर : शहर जिल्ह्यात भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणांसाठी प्राथमिक व माध्यमिकचे एकूण 97 आश्रम शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये शेकडो मुले-मुली शिक्षण घेतात. याच आश्रम शाळांना विधानमंडळाचे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने येथील मोजक्याच आश्रम शाळांना भेट देऊन पाहणी केली. या समितीला या शाळामधील वास्तव दिसून आले. हे वास्तव चित्र या शाळांवर नियंत्रण ठेवणार्या कार्यालयातील अधिकारी व निरीक्षक यांना यापूर्वी कधी दिसलेच नाही. आज भटके विमुक्त दिन साजरा होत आहे. पण या शाळांमधील स्थितीवरील उपाय कधी होणार याचेही मंथन यानिमित्त होणे अपेक्षित आहे.
पुणे विभागात सर्वाधिक आश्रम शाळा असलेला आपला जिल्हा आहे. 97 शाळांमध्ये भटके विमुक्त जाती-जमातीतील शेकडो गरीब विद्यार्थी शिकतात. हे निष्पाप विद्यार्थी शाळा देईल खाऊन दिवस काढतात व शिक्षण घेतात. या विषयी ते कुठेही वाच्यता करत नाहीत. त्याची वाच्यता करण्याची सोय देखील नाही. गुणवत्ता वाढीच्या विषयावर ना संस्था सकारात्मक आहे ना शिक्षक. शिवाय कोणता विषय कोण शिकवतात याची माहिती खद्द मुख्याध्यापकांनाही नसल्याचे या समितीने याची देही याची डोळ्याने पाहिले.
भौतिक सुविधाही नाहीत
एकाच वर्गातील काही मुले एकमेकांना ओळखतही नसल्याचे समितीने पाहिले. कधीच शाळेला न येणारे शिक्षक विद्यार्थ्यांसह समितीलाही दिसले. तसेच, ज्या वर्गात विद्यार्थी शिकतात. त्याच वर्ग खोल्यांत या विद्यार्थ्यांचा मुक्काम असल्याचेही यांनी पाहिले. भौतिक सुविधाही नाहीत. या शाळांवर नियंत्रण स्थानिक कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी व निरीक्षकांच्या शाळां भेटीच्या वेळी पाहणी करतांना हे चित्र दिसले नसेल का? हा प्रश्नही उपस्थित होतोच.